पीटर सुबेर हे ओपन ॲक्सेस (OA) चे जागतिक पातळीवर मान्यता प्राप्त तज्ज्ञ आहेत. ते प्रामुख्याने पाश्चिमात्य तत्त्वज्ञानाचा इतिहास, कायद्याचे तत्त्वज्ञान या विषयांचे विशेषज्ज्ञ आहेत. त्यांनी कायद्याचे शिक्षण घेतले आहे परंतु त्यांनी तो पेशा म्हणून स्वीकारलेला नाही. ते (Suber) हार्वर्ड विद्यापीठ आणि इतर संस्थांसाठी संशोधन क्षेत्रात सल्ला देणे, संशोधन सहकार्य साधनांची बांधणी आणि थेट सहाय्य यांच्या एकत्रित उपयोगाने ओपन ॲक्सेसची (OA) वाढ करण्याचे कार्य करतात.
सुबेर विद्यापीठाच्या ग्रंथालयातील (Harvard University Library) Harvard Office for Scholarly Communication चे आणि Berkman Klein Center for Internet and Society च्या Harvard Open Access Project चे संचालक आहेत. तसेच ते बर्कमन क्लेइन या संस्थेमध्ये जेष्ठ संशोधकही आहेत. संपूर्ण जगात ओपन ॲक्सेस चळवळीवर त्यांचे विचार, पुस्तके, लेख आणि भाषणांचा खूप मोठ्या प्रमाणात प्रभाव पडलेला आहे.
पीटर सुबेर यांच्याकडून Open Interview द्वारे सद्यस्थितीतील ओपन ॲक्सेस संदर्भातील विशेषत्वाने प्लान S, प्लान U, आर्टिकल प्रोसेसिंग चार्जेस (APC), ॲक्सेस विषयक मुद्दे आणि प्रिडेटरी (predatory) प्रकाशनाच्या प्रघातांबद्दल जाणून घेऊया. संतोष हुलगाबली यांना मुलाखत देताना सुबेर यांनी तत्त्वज्ञानापासून ओपन ॲक्सेस चळवळीच्या त्यांच्या प्रवासातील प्रेरणादायक गोष्टी प्रांजळपणे सांगितल्या आहेत. याशिवाय त्यांनी त्यांच्या हावर्ड विद्यापीठातील आणि इतर चालू असलेल्या कार्याबद्दल भाष्य केले आहे.
.
· आपण तत्वज्ञानाचे प्राध्यापक आणि कायदाविषयक व्यावसायिक आहात. ओपन ॲक्सेस (OA) चळवळीचे आपण आघाडीचे प्रमुख तज्ज्ञ आहात. आपल्यातील या बदलाबद्दल जाणून घ्यायला आमचे अनेक वाचक उत्सुक आहेत.
१९८० च्या सुरुवातीच्या काळात मी माझ्या कारकिर्दीची सुरुवात प्रकाशन अभ्यासक म्हणून केली. ARPANET च्या नंतरचा आणि माहितीजाल आणि वेबच्या आधीचा हा काळ होता. १९९३ मध्ये Mosiac browser आला, आणि मी माझी प्रकाशने, लेख HTML च्या सहाय्याने ऑनलाइन उपलब्ध करायला सुरुवात केली. मी हे कबूल करतो की, त्या वेळेला माझा खरा उद्देश HTML आणि माहितीजालावर वेगवेगळे प्रयोग करणे हा होता. परंतु माझ्या असे लक्षात आले की, माझ्या तत्वज्ञान आणि कायदा या विषयावरील मुद्रित लिखाणापेक्षा या नव्या स्वरूपातील लेखांना अधिक चांगला प्रतिसाद मिळतो आहे. तेव्हापासून मी नव्याने उदयाला येणाऱ्या जागतिक डिजिटल जाळे (global digital network) या माध्यमाचा अभ्यासपूर्ण लेखनासाठी गंभीरपणे विचार करू लागलो. कारण माझ्या असे निदर्शनास आले की इतर अभ्यासक त्याबद्दल बोलत वा लिहीत नव्हते. मी स्वतःच त्याबद्दल लिहिण्यास सुरुवात केली, आणि त्यातूनच २००१ साली मी माझे वार्तापत्र सुरू केले. दोन वर्षांनी मी माझा प्राध्यापकाचा व्यवसाय सोडून पूर्णवेळ ओपन ॲक्सेस कार्याला वाहून घेतले. याबद्दल तुम्हाला अधिक जाणून घ्यायचे असेल तर, MIT Press ने २०१६ साली प्रकाशित केलेल्या ‘Knowledge Unbound‘ या पुस्तकाच्या प्रस्तावनेत मिळेल.
· आपण हॉवर्ड विद्यापीठाच्या Office of Scholarly Communication (OSC) आणि Harvard Open Access Project (HOAP) चे संचालक आहात. तुम्ही या विभागाच्या कार्यपद्धतीबद्दल आणि हॉवर्ड विद्यापीठात, आपण सुरु केलेल्या उपक्रमाबद्दल थोडक्यात सांगाल का?
OSC चे कार्यालय हॉवर्ड ग्रंथालयात आहे. हा विभाग हॉवर्डच्या ओपन ॲक्सेसची धोरणे कार्यान्वित करतो. यामध्ये हॉवर्ड विद्यापीठाच्या शैक्षणिक स्तरावरील ९ धोरणे, केंद्रीय स्तरावरील ५ धोरणाचा समावेश आहे. याशिवाय इतर कोणत्याही धोरणामध्ये ज्याचा समावेश होत नाही अशा संलग्नित केंद्रासाठी, एक स्वयंसेवी Individual Open-Access Licence हे धोरण आहे. हि सर्व धोरणे OSC कार्यान्वित करते आणि आमच्या प्रकाशन संग्रहाचे ( repository ) व्यवस्थापन, Digital Access to Scholarship at Harvard (DASH) करते. आम्ही हॉर्वर्ड विद्यापीठातील जे अभ्यासक/ लेखक, त्यांच्या लेखाच्या प्रकाशनासाठी Article Processing Charges (APC) घेणाऱ्या ओपन ॲक्सेस (OA) नियतकालिकांची निवड करतात, त्यांना लेखप्रक्रियेचे शुल्क भरण्यासाठी निधी पुरवण्याची व्यवस्था करतो. आम्ही स्वामित्त्व हक्क सल्ला कार्यक्रम चालवतो, ज्यामध्ये OSC बरोबरच हॉर्वर्ड ग्रंथालय आणि विद्यापीठातील अभ्यासकांना वैयक्तिक मार्गदर्शन केले जाते. हॉवर्ड-वाईड कार्यक्रमांतंर्गत इलेकट्रॉनिक प्रबंधांना ओपन ॲक्सेस मिळवून देण्यासाठी, आम्ही खूप मोठी भूमिका बजावतो. आम्ही विद्यापीठाच्या नियतकालिकांचे रूपांतर ओपन ॲक्सेसमध्ये करण्यासाठी आणि हार्वर्ड ग्रंथालये, म्युझियम्सना त्यांच्या डिजिटायझेशन प्रकल्पासाठी ओपन ॲक्सेस संबंधी धोरणे अवलंबिण्यास मदत करतो. त्याचबरोबर आम्ही इतर संस्थांना सुद्धा त्यांच्या हक्क संरक्षणाची (Rights-Retention) अंमलबजावणी करण्यासाठी किंवा Harvard-style, ओपन ॲक्सेस धोरणे समजून घेण्यासाठी, कार्यान्वित करण्यासाठी मदत करतो.
HOAP चे कार्यालय Berkman Klein Centre for Internet and Society येथे आहे. याद्वारे हार्वर्ड आणि इतर संस्थांमध्ये ओपन ॲक्सेसला उत्तेजन देण्यासाठी विविध उपक्रम राबविले जातात. या केंद्रातील अधिकारी Open Access Tracking Project (OATP) चे व्यवस्थापन पाहतात, तसेच ओपन ॲक्सेस tagging करण्यासाठी व्यासपीठ विकसित करणे हि कार्ये करतात (Tag Team). त्याचबरोबर विद्यापीठाच्या ओपन ॲक्सेस धोरणासाठी व सर्वोत्कृष्ट पद्धती (Good Practices) अंमलात आणण्यासाठी, मार्गदर्शक सूत्रे बनविणे हे हि केले जाते. Societies and Open Access Research Project (SOAR) आणि Open Access Directory (OAD) मध्येही HOAP चा महत्वाचा वाटा आहे. मी स्वयंस्फूर्तीने विनामोबदला OSC आणि HOAP ला सल्ला देत असतो (pro bono consultancy). सध्या HOAP कोणत्याही निधीशिवाय, स्वयंस्फूर्तीने कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या साहाय्याने कार्य करीत आहे. खरतर पूर्वी याला निधी उपलब्ध होता, मी निधी मिळविण्यासाठी नवीन स्त्रोतांची उपलब्धता पडताळून पाहत आहे.
· आपण ओपन ॲक्सेस चळवळ, प्रामुख्याने अभ्यासपूर्ण लेखनाचे संप्रेषण किंवा संशोधनविषयक लिखाण यापुरतीच सीमित ठेवली आहे का? खरेतर विदवत्तापूर्ण साहित्याशिवाय इतर साहित्याच्या ॲक्सेस संदर्भात अनेक मुद्दे आहेत (जसे माहिती जनतेला खुली करून देण्यासाठी चाललेला Carl Malamud यांचा लढा).
माझ्या मते ओपन ॲक्सेस हा ॲक्सेसचाच एक प्रकार आहे, तो काही आशयाचा प्रकार नाही. त्यामुळे ते फक्त अभ्यासपूर्ण लेखनालाच लागू न पडता, सर्व प्रकारच्या लेखनाला लागू पडते. अभ्यासपूर्ण लेखनापलीकडे सार्वजनिक कायदे, शासकीय दस्तऐवज, पत्रकारिता, कला, संगीत, दृश्य माध्यमे आणि अर्थात सॉफ्टवेअर अशा अनेक प्रकारच्या माध्यमांच्या ओपन ॲक्सेससाठी अनेक व्यक्ती आणि संस्थांनी स्वतःला वाहून घेतले आहे. या दृष्टीने Carl Malamud यांचे उदाहरण अतिशय योग्य आहे व मी त्यांच्या कार्याची प्रशंसा करतो.
अलीकडचा ओपन ॲक्सेस आशयाचा सर्वात नवीन प्रकार म्हणजे शिल्पाकृती किंवा डायनोसॉरच्या हाडांच्या अवशेषांसारख्या दृश्य वस्तूंचे डिजिटल त्रिमितीय (3D) स्कॅनिंग. प्रत्यक्षपणे या दृश्य वस्तू ओपन ॲक्सेस असू शकणार नाहीत, कारण त्या अणूने बनल्या आहेत, बिट्सने नाही. परंतु त्यांच्या डिजिटली स्कॅन केलेल्या प्रतिकृती मात्र, ओपन ॲक्सेस होऊ शकतात. ज्या व्यक्ती या मूळ वस्तू प्रत्यक्षपणे पाहू शकत नाहीत, त्यांच्यापर्यंत या प्रतिकृतीच्या साहाय्याने पोहोचवू शकतो. या स्कॅन केलेल्या प्रतिकृतीचे त्रिमितीय मुद्रण (3D printing) करणे, चक्राकृती (Rotate) फिरवणे, मोठ्या (zoom) करणे, पूर्णपणे एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत (panning) पाहणे असे दृश्यमानतेचे (visualization) असे विविध प्रकार शक्य आहेत, जे प्रत्यक्ष वस्तू पाहण्यापेक्षा जास्त उपयुक्त आहेत. तरीही ओपन ॲक्सेस हे अभ्यासपूर्ण लेखनासाठी, एका चांगल्या कारणासाठी जोडले गेले आहे. हि संज्ञा सर्वप्रथम अभ्यासपूर्ण लेखनाचा अंतर्भाव करण्यासाठी बुडापोस्ट ओपन ॲक्सेस इनिशिएटिव्ह मध्ये वापरली गेली. जवळ जवळ दोन दशके अभ्यासपूर्ण लेखनासाठी, ओपन ॲक्सेसची प्रगती, वादविवाद, विरोध याकडे लक्ष वेधले गेले होते. सगळ्यात महत्वाचे म्हणजे ओपन ॲक्सेससाठी नियतकालिकांमधील लेख हे विशेष करून सहजप्राप्य आहेत, कारण अभ्यासक आर्थिक लाभासाठी न लिहिता, लेखनाच्या प्रभावासाठी (impact) लिहितात. त्यांनी त्यांचे लेखन ओपन ॲक्सेसला उपलब्ध करून दिल्याने, त्यांचे आर्थिक नुकसान तर होत नाहीच, उलट त्यांना वाचक मिळून त्यांच्या लेखनाचा प्रभाव वाढतो. अर्थात ओपन ॲक्सेस नियतकालिकांसाठीहि काही अडसर आहेतच, परंतु संगीत, कथा, कादंबऱ्या, चित्रपट आणि पत्रकारिता यासारख्या विविध माध्यमांच्या, ओपन ॲक्सेसला काही अतिरिक्त अडथळ्यांना सामोरे जावे लागते. यांचे निर्माते स्वामीत्व शुल्काची अपेक्षा करतात आणि त्यावर अवलंबून राहतात.
· ओपन ॲक्सेस संदर्भात प्लॅन S आणि प्लॅन U याबद्दल, पुन्हा पुन्हा विचारविमर्ष आणि चर्चा चालू आहे. या प्लॅन्सनी किंवा प्रारूपांनी (मॉडेल) ओपन ॲक्सेस ला कशी गती मिळेल? अभ्यासपूर्ण संप्रेषण पद्धतीवर याचा दूरगामी काय प्रभाव पडेल?
मला प्लॅन U आवडतो आणि त्याबद्दल चर्चा होत आहे, याचा मला आनंद आहे. हा आराखडा तयार करणाऱ्यांच्या प्लॅन U आणि प्लॅन S हे एकत्रितपणे राबवण्याच्या मताशी मी सहमत आहे. त्यात निवडीची आवश्यकताच नाही. म्हणूनच प्लॅन S ला त्याच्या मार्गाने पुढे जाऊ दे. प्लॅन U च्या गुणवत्तेकडे दुर्लक्ष करण्यासाठी किंवा नाकारण्यासाठी, हे कारण होऊ शकत नाही.
प्लॅन S चा वेग ठळकपणे वाढतो आहे. एप्रिलमध्ये जेंव्हा तो संयुक्तपणे प्रसिद्ध झाला, तेंव्हा त्याच्या प्रायोजक सदस्यांपैकी युरोप मधील ११ सार्वजनिक क्षेत्रातील सदस्य होते. आता हि संख्या १९ पर्यंत वाढली आहे. त्यात खाजगी आणि युरोपबाहेरील सदस्यांचा समावेश आहे.
CC-BY नुसार ओपन लायसन्ससाठी आणि प्रतिबंध रोखण्याच्या दृष्टीने हे धोरण प्रभावी आहे. नवीन आवृत्तीत ग्रीन compliance चा पर्याय अधिक सुस्पष्ट आणि कमी त्रासदायक केला आहे. लेखाचे हक्क अबाधित ठेवण्याची गरज असणे हे अतिशय योग्य आहे. संमिश्र (hybrid) नियतकालिकांच्या बाबतीत त्यांचा संक्रमणकाळ सोडून, इतर वेळेस APCs (Articles Processing Charges) नाकारणे हे योग्यच आहे, तसेच पूर्तता (compliant) असलेल्या नियतकालिकांनी त्यांच्या खर्च व इतर वाणिज्य तपशीलाबद्दल (data) पुरेशी पारदर्शकता बाळगणे आवश्यक आहे. पुस्तकांना ओपन ॲक्सेस देणे हि चांगली योजना आहे, तथापि त्यात अडचणी असल्याने तात्पुरती हि योजना बाजूला ठेवणे योग्य ठरेल.
संयुक्तपणे प्रायोजकत्व देणारे Declaration on Research Assessment (DORA) ला मान्यता देऊन, संशोधनाचे मूल्यमापन करताना त्यात अंतर्भूत असलेल्या उत्तेजन (incentives) देण्याच्या अनिष्ट प्रथा टाळून, त्यात बदल घडविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू शकतील. त्यांनी DORA च्या शिफारशी अनुसरण्यास सुरवात केली आहे ते योग्यच आहे.
सर्वसामान्य offset करारांना किंवा read -and -publish करारांना मी पाठिंबा देत नाही, कारण त्यामुळे संमिश्र (hybrid) नियतकालिकांना निधी मिळून त्यांची वाढ होते. त्या दृष्टीने प्रत्यक्ष प्लॅन S पेक्षा, मी प्लॅन S चा संमिश्र (hybrid) नियतकालिकांना असलेला विरोध स्वीकारतो. जी संमिश्र (hybrid) नियतकालिके विशिष्ट कालावधीत non-hybrid नियतकालिकात रूपांतरित होऊ इच्छितात, त्याच्या offset करारांना प्लॅन S पाठिंबा देतो, हे योग्यच आहे.
प्लॅन S च्या प्रत्यक्ष परिणामाची सुरवात अगदी छोट्या प्रमाणात होईल, कारण जगात चाललेल्या संशोधनाच्या तुलनेत, संघ सदस्य संशोधनाला करीत असलेल्या अर्थसहाय्याचे प्रमाण फार थोडे आहे. पण तरी देखील, पुढे टाकलेले लहान पाऊलही पुढेच नेणारे असते, जरी ते प्लॅन S पेक्षा कितीतरी लहान असले तरी. याचा अप्रत्यक्ष परिणाम मात्र फार मोठा असू शकतो. संघ (coalition) सदस्यांनी नवीन सदस्यांना यापूर्वीच सामावून घेण्यास सुरवात केली आहे व ती सतत चालू राहील. प्लॅन S बाबत असलेल्या आक्षेपांना उत्तरे देऊन, त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी त्यात बदल केलेले आहेतच, ते प्रयत्न पुढेही चालू राहतील. या चांगल्या बदलांमुळे तो प्लॅन अधिक परिपूर्ण होऊन, इतर प्रायोजकांना या संघात सहभागी होण्यासाठी प्रेरणा मिळेल किंवा त्यांची स्वतःची ओपन ॲक्सेस धोरणे, संघात सहभागी न होताही, अधिक सशक्त करतील.
काही वर्षांपूर्वी, प्रायोजकांच्या ओपन ॲक्सेस धोरणांमध्ये zero length embargo, ओपन लायसन्स ची गरज, संमिश्र नियतकालिकांना APC देण्यासाठी विरोध या मूलभूत बाबीचा अंतर्भाव होता. या कल्पनांची अंमलबजावणी प्लॅन S ने प्रथमतः सुरु केली असे नाही, परंतु या कल्पना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्याची नक्कीच मदत होईल.
· सद्यस्थितीत ओपन ॲक्सेस चळवळीच्या वाढीसाठी येणारे अडसर कोणते आणि ते दूर करण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी एकत्रितपणे कोणते प्रयत्न करणे आवश्यक आहे?
मी फार पूर्वी माझे मत मांडले होते की, ओपन ॲक्सेसचा सगळ्यात मोठा अडसर, त्याबद्दलचे गैरसमज आणि अपरिचित असणे हे आहेत आणि माझ्या या मताशी मी ठाम आहे. हे गैरसमज खूप मोठ्या संख्येने आहेत, त्या सगळ्यांबद्दल मी इथे उल्लेख करू शकत नाही. परंतु त्यातील काही जास्त धोकादायक आणि सर्वत्र पसरलेले आहेत, ते असे : संपूर्ण किंवा बहुतकरून सर्व ओपन ॲक्सेस हे गोल्ड ओपन ॲक्सेस आहेत किंवा बहुतेक सगळी ओपन ॲक्सेस नियतकालिके APCs आकारतात ; APC मूल्य लेखक स्वतः भरत आहेत; बहुतांश ओपन ॲक्सेस नियतकालिकांचा दर्जा सुमार असतो ; किंवा त्या predatory असतात; ग्रीन ओपन ॲक्सेस चा प्रतिबंध केलाच पाहिजे; CC- BY प्रमाणे ओपन लायसेन्स हे ग्रीन ॲक्सेस वापरू शकणार नाही; लेखनावरचे हक्क अबाधित राखण्याच्या धोरणांतर्गत ग्रीन ओपन ॲक्सेससाठी लेखक आणि संस्थांकडून परवानगी न घेता प्रकाशकांकडून घ्यावी लागेल.
अनेक लेखकांना त्यांच्या ओपन ॲक्सेस पर्यायांबद्दल माहिती नसते. जर ओपन ॲक्सेस नियतकालिकात लेख प्रकाशित करण्याचा, सर्वज्ञात असलेला शुल्क आकारणीचा पर्याय, लेखकाच्या बाबतीत अयशस्वी झाला तर, त्यांचे लिखाण ओपन ॲक्सेस मध्ये प्रकाशित होणार नाही असा निष्कर्ष ते आधीच काढतात. त्याचप्रमाणे अनेक प्रकाशकांनाही त्यांच्या ओपन ॲक्सेस पर्यायांबद्दल माहिती नसते. ओपन ॲक्सेस कडे वळण्याचा सर्वज्ञात सशुल्क पर्याय जर त्यांच्या बाबतीत यशस्वी झाला नाही, तर ते यशस्वीपणे सशुल्क ओपन ॲक्सेस कडे कधीही वळू शकणार नाहीत असा निष्कर्ष काढतात.
· Predatory प्रकाशनांच्या सध्याच्या वाढत्या संख्येबद्दल, आपली काय निरीक्षणे आहेत आणि तो कमी करण्यासाठी तुम्ही कोणते मार्ग सुचवाल?
Predatory नियतकालिके आणि प्रकाशक अस्तित्वात आहेत आणि त्यांच्यामुळे ओपन ॲक्सेस बदनाम होत आहे. त्यांच्याबद्दल चर्चा होणेही गरजेचे व समर्थनीय आहे, परंतु ही चर्चा त्यांच्या प्रत्यक्ष संख्येच्या मानाने, प्रमाणाबाहेर जरा जास्तच होते, त्यामुळेही ओपन ॲक्सेस बदनाम होते. ज्याप्रमाणे खेळामध्ये ॲथलेटसच्या डोपिंग विषयी होणाऱ्या व्यापक चर्चेच्या मानाने, त्यातून दोषी खेळाडू नक्की किती याचा अंदाज येत नाही.
मला इथे अशा predatory नियतकालिकांबद्दल लेखक आणि वाचकांना सतर्क करायचे आहे. यासाठी predatory नियतकालिकांची काळी यादी किंवा विश्वासार्ह नियतकालिकांची श्वेत यादी केली तर ती सहाय्यभूत ठरेल. यासाठी कोणता दृष्टिकोन चांगला आहे याबद्दल अनेक चर्चा व वाद आहेत. सद्यस्थितीतील उद्दिष्टे पाहता दोघांमध्ये निवड करण्यापेक्षा, अभ्यासकांना याची सुस्पष्ट दिशा देऊन सुरुवात करण्यास मदत करणे जास्त गरजेचे आहे. कोणतीही लवचिकता नसलेली आणि कृत्रिमपणे बनवलेली यादी इथे गौण आहे, त्याऐवजी अभ्यासकांनी त्यांचे स्वतःचे निकष अमलात आणणे जास्त महत्त्वाचे आहे. याच अनुषंगाने भावी लेखकांनी विशिष्ट नियतकालिकातील काही लेखांचे वाचन करून कसोटी लावणे आवश्यक आहे.
समजा, जर तुम्ही तुमच्या क्षेत्रातील एखाद्या ओपन ॲक्सेस नियतकालिकामध्ये लेख प्रकाशित करण्याचा विचार करत आहात, आणि त्या नियतकालिकाचे नावही यापूर्वी तुम्ही ऐकलेले नाही, त्यामुळे त्याच्या दर्जाबद्दल तुम्ही साशंक आहात. तुम्ही त्या विशिष्ट विषयातील तज्ज्ञ आहात, मग त्या नियतकालिकात प्रकाशित झालेल्या लेखांबद्दल तुमचे मत काय असेल? अशा नियतकालिकांशी संलग्न असणे, ही गोष्ट तुम्हाला अभिमानास्पद वाटेल की लाजिरवाणी ? या कसोटीत अविश्वासार्ह नियतकालिकांचा टिकाव लागत नाही, या कसोटी मुळे तुमचा वेळ वाया गेला असे मानण्याचे कारण नाही. जर प्रसिद्ध झालेले लेख तुमच्या स्वतःच्या निकषानुसार अगदी खालच्या दर्जाचे असतील, तर ते तुम्हाला तात्काळ निदर्शनास येतील. जर तसे झाले नाही तर, तुमच्या कसोटीच्या निरीक्षणांच्या आधाराने तुम्हाला तुमच्या क्षेत्राबद्दल थोडी अधिक माहिती होईल.
अनेकांच्या मते ओपन पिअर रिव्ह्यू हा आशादायक दृष्टीकोन आहे, मी याच्याशी सहमत आहे. पारंपारिक पिअर रिव्ह्यू पद्धत कमकुवत किंवा अप्रामाणिक आहे, म्हणून predatory नियतकालिके निर्माण होतात ही समस्या नाही. याउलट हा एक नियतकालिक विश्वासार्ह करण्याचा हा एक ठोस मार्ग आहे. मात्र एखादे नियतकालिक बंदिस्त (close) पिअर रिव्ह्यूचा अवलंब करते का? असल्यास किती काटेकोरपणे व दर्जेदारपणे, हे बाहेरून अजमाविणे कठीण आहे. मुक्त (open) पद्धतीने पिअर रिव्ह्यू करणाऱ्या नियतकालिकांच्या बाबतीत ही समस्या उद्भवत नाही. ते त्यांची पिअर रिव्ह्यू प्रक्रिया तंतोतंत, तपशीलवार सांगतात. पियर रिव्ह्यू केलेला नसताना, केलेला आहे असे ते सांगू शकत नाहीत. मुक्त रिव्ह्यूचा अवलंब करणे हे इतर अनेक कारणांकरिता आवश्यक आहे. नव्याने प्रकाशित होणाऱ्या नियतकालिकांबाबत लोकांच्या मनातील संशयाचे धुके दूर करण्यासाठी ही एक चांगली युक्ती आहे.
प्रिप्रिंट मात्र या समस्येपासून मुक्त असतात, त्यात पिअर रिव्ह्यूचा अवलंब नसतो, त्यांच्याबद्दल कोणतीही अनिश्चितता नसते आणि त्यात चुकीची गृहितके मांडली जात नाहीत. तुम्ही तुमचे नवीन लिखाण प्रिप्रिंट म्हणून प्रसारित केले तर नियतकालिकात प्रसिद्ध करण्याबद्दलचा अंतिम निर्णय तुम्ही नंतर घेऊ शकता. दरम्यान तुम्ही लेखनाला मिळालेल्या अभिप्रायांच्या आधारे तुमचे लिखाण अधिक सशक्त करू शकता आणि सहकाऱ्यांचा असा एक गट तयार करू शकता, ज्यातील सदस्य तुमचे लिखाण कुठे प्रकाशित झाले आहे, यापेक्षा ते कसे आहे हे याचा विचार करतील.
सशुल्क ओपन नियतकालिकेसुद्धा या समस्येपासून मुक्त आहेत. Predatory ओपन ॲक्सेस नियतकालिके सुरू करण्यामागचा प्रमुख उद्देश, प्रकाशन शुल्क घेणे किंवा सदस्य वर्गणी आकारणे हाच असतो. मात्र सगळीच शुल्क आकारणारी नियतकालिके predatory नाहीत, बरीच सशुल्क नियतकालिके विश्वासार्ह आहेत, परंतु सगळीच predatory नियतकालिके सशुल्क आहेत.
मी आत्ताच म्हंटल्याप्रमाणे सगळी scam नियतकालिके ओपन ॲक्सेस नसतात, त्यातील काही सशुल्क असतात. इथे आपण औषधनिर्माण आस्थापनांनी त्यांच्या उत्पादनांची प्रसिद्धी करण्यासाठी निधी पुरवलेली, Elsevier प्रकाशनाची नऊ बनावट (scam) नियतकालिके विसरू शकत नाही. मात्र हे उघडकीस येईपर्यंत Elsevier ने ही गोष्ट थांबवली नव्हती व दिलगिरीही व्यक्त केली नव्हती. अशी अनेक उदाहरणे असतील, जी अद्याप उघडकीस आलेली नसल्याने आपल्याला माहीत नाहीत.
· ओपन ॲक्सेस (OA) प्रकाशक APC मध्ये वाढ करीत आहेत, याबाबतीतले ताजे उदाहरण म्हणजे BioMed Central (इथे मला आठवण करून द्यावीशी वाटते कि २००३ साली या नियतकालिकांच्या संदर्भात आपण निसंदिग्धपणे विधान केले होते कि संपादकानी “author pays” हि दुर्दैवी व चुकीची संज्ञा टाळावी) याबद्दल आपले काही मत?
सर्वप्रथम संज्ञेच्या संदर्भात, मी अजूनही “author pays” ही संज्ञा टाळावी याच मताचा आहे. हे अतिशय चुकीचे आणि दिशाभूल करणारे आहे. सशुल्क नियतकालिकांच्या बाबतीत बऱ्याचदा लेखकांचे प्रायोजक(५९%) किंवा लेखकांचे नियोक्ते (२४%) आणि फार क्वचित लेखक स्वतः (१२%) शुल्क देतात. मी इथे २०११ या सालातील आकडेवारीचा आधार घेत आहे, कारण मला नवीन आकडेवारी मिळाली नाही, पण मी नवीन आकडेवारीचे स्वागतच करीन .
“Author pays” ही संज्ञा वापरणाऱ्या सर्वाधिक किंवा बहुतांश ओपन ॲक्सेस आणि ओपन ॲक्सेस नियतकालिकांचा यात समावेश आहे असे जे पत्रकार भासवितात, ते मुळात चुकीच्या माहितीचा प्रसार करीत असतात. ओपन ॲक्सेस नसलेले प्रकाशक या संज्ञेचा उपयोग भीती, अनिश्चितता आणि साशंकता (Fear, Uncertainty and Doubt-FUD) पसरवण्यासाठी करतात. जे प्रकाशक सशुल्क ओपन ॲक्सेस ही संज्ञा वापरतात, ते स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतात.
नियतकालिकाच्या प्रकाशकांना त्यांचा उत्पादन खर्च मिळवता आला पाहिजे तसेच त्यांनी व्यवसायवृद्धी साठी वाजवी नफा घेणेही योग्य ठरेल. त्यांच्या खर्चात वारंवार होणारे बदल हे प्रचंड असतात, त्यामुळे जे APCs खर्चमूल्यावर आधारित असतात, त्यातही खूपच बदल होऊ शकतात. त्याअर्थाने APCs खरोखर उत्पादन खर्चाशी निगडित असतात का? हे बाहेरून अजमाविणे अवघड आहे. अर्थात हे सर्वच बाबतीत घडत नाही हे उघड आहे. बरीच नियतकालिके बाजारात परवडू शकतील असे दर आकारतात, कारण याद्वारे त्यांना त्यांचा नावलौकिक आणि इम्पॅक्ट फॅक्टर, प्रभावीपणे राखता येतो. याच बरोबर आणखी एक वाईट गोष्ट म्हणजे प्रकाशनासाठी शुल्क देणाऱ्या संस्था अवाजवी APC द्यायला तयार असतात, यामुळे ते बाजारात परवडते असा समज दृढ होतो.
मी जरी नि:शुल्क नियतकालिकांना आणि त्यांच्या प्रसाराला पाठिंबा देत असलो तरी सशुल्क नियतकालिकांना माझा विरोध नाही व मला नाही वाटत की ती नाश पावत आहेत. वास्तविक सशुल्क नियतकालिके, बाजारात शुल्क पातळीवर स्पर्धा करू शकतील अशी स्थिती निर्माण करणे हे दीर्घकालीन उद्दिष्ट असायला हवे. अशा बाजारात जास्त शुल्क आकारणारी नियतकालिके त्यांचे लेखक गमावतील. यासाठी विविध मार्ग अनुसरायला लागतील, लेखकांना ते ज्या नियतकालिकात APC देऊन त्यांचे लेख प्रकाशित करतात त्याकडे लक्ष वेधून घेण्यासाठी आर्थिक लाभ देणे आणि ज्या संस्था लेखकांसाठी APC देतात त्यावर कमाल मर्यादा घालणे आवश्यक आहे. अशा प्रकारची उत्तेजने सर्वत्र अस्तित्वात आहेतच, पण त्याचा बाजारावर प्रभाव पडेल इतपत प्रसार झालेला दिसत नाही, जो मला अपेक्षित आहे. त्याअर्थी यासाठी बाजार अस्तित्वातच आला नाही असे मी मान्य करतो. APC चे नियंत्रण नसलेले वाढते दर ज्यांना चिंतीत करतात, त्यांनी बाजार निर्माण करण्यासाठी विविध उतेजने देण्याचे समर्थन करायला हवे. तसेच नि:शुल्क ओपन ॲक्सेसला केवळ नैतिक पाठिंबा न देता त्यांना आर्थिक पाठबळ देण्याची गरज आहे.
प्लान S च्या प्रायोजकांनी सुरुवातीला त्यांच्या मार्फत दिल्या जाणाऱ्या APC वर कमाल मर्यादा घालण्याचे आश्वासन दिले होते. या प्लानच्या नवीन आवृत्तीत हे आश्वासन मागे घेण्यात आले आहे, जर नियतकालिकानी त्यांच्या आर्थिक व्यवहाराबाबत पुरेशी पारदर्शकता आणली, तर APC वर नियंत्रण राहू शकेल अशी अपेक्षा आहे. या मुद्द्यावर मी प्लान S च्या समुहाप्रमाणे फारसा आशावादी नाही. किमान पक्षी ते अशा मर्यादा घालून APC अवाजवी पातळीवर जाणार नाहीत याची काळजी घेतात.
· ओपन ॲक्सेस नियतकालिके नफा मिळवण्यासाठी, APC चा एक साधन म्हणून गैरवापर करत आहेत का? ओपन ॲक्सेस नियतकालिकांनी लेखकांना त्यांचे थेट ग्राहक मानणे बंद केले आहे व त्यांचे आर्थिक शोषण करणे थांबवले आहे, हे दृश्य केव्हा पाहावयास मिळेल?
ओपन ॲक्सेस नियतकालिकांसाठी व्यवहार्य असलेल्या अनेक प्रारूपांपैकी, APC आधारित प्रारूप, हे एक प्रारूप आहे. हे अतिशय अल्प प्रमाणात वापरले जाणारे प्रारूप आहे. सद्यस्थितीत पिअर रिव्ह्यू ओपन ॲक्सेस नियतकालिकांत केवळ ३०% नियतकालिके या प्रारूपाचा अवलंब करत आहेत. सर्वच प्रकारच्या अभ्यासपूर्ण लेखनासाठी ते योग्य नाही, ज्या ज्ञानाच्या क्षेत्रांना आणि संस्थांना उत्तम निधीची उपलब्धता आहे, तिथे हे अधिक चांगल्या प्रकारे लागू पडेल. कदाचित अशा पद्धतीमध्येही याची कार्यवाही असंतुलितपणेही होऊ शकते. ज्या ज्ञान क्षेत्रांना निधीची कमतरता असते तिथे हि गोष्ट लागू पडणे अशक्य आहे. ही गोष्ट निधीची कमतरता असणाऱ्या ज्ञानक्षेत्रांसाठी नित्याची आहे, जसे संपन्न राष्ट्रांमध्ये सुद्धा मानव्य विद्या शाखांना मिळणारा कमी निधी.
जर सशुल्क प्रारूप वापरणाऱ्या ओपन ॲक्सेस नियतकालिके आणि प्रकाशकांना इतर कोणतेही प्रारूप लागू न पडता हेच प्रारूप लागू पडत असेल, तर मी त्यावर टीका करणार नाही. परंतु कोणत्याही प्रकारची छाननी न करता, इतर कोणतेही प्रारूप लागू पडणार नाही, असे गृहीत धरणाऱ्या ओपन ॲक्सेस नियतकालिके आणि प्रकाशकांवर मी नक्कीच टीका करीन. पियर रिव्ह्यू ओपन ॲक्सेस नियतकालिकांना समर्थन देणाऱ्यांनी, डझनाहून अधिक असलेल्या इतर अनेक व्यावसायिक प्रारूपांचा विचार देखील केलेला नाही.
मला आपल्याला सशुल्क प्रारुपापुरते सीमित किंवा मर्यादित ठेवायचे नाही. परंतु बरीच विद्यापीठे आणि संशोधन प्रायोजक, ओपन ॲक्सेस नियतकालिकांचे समर्थन करणारी उद्दिष्टे स्विकारतात मात्र सरतेशेवटी निःशुल्क नियतकालिकांच्या पर्यायाचा स्विकार न करता सशुल्क नियतकालिकांचा पर्याय स्विकारतात. काही वेळेला ते सर्वाधिक किंवा सर्व ओपन ॲक्सेस नियतकालिके सशुल्क आहेत असा गैरसमज पसरवतात. परंतु बहुतेक सर्व ओपन ॲक्सेस नियतकालिके निःशुल्क आहेत हे बऱ्याचजणांना समजले आहे आणि त्याना निशुल्क नियतकालिकांना अर्थसहाय्य देण्यापेक्षा APC आकारणाऱ्या नियतकालिकांना APC देणे सुकर वाटते. ओपन ॲक्सेस समूहाने या समस्येचे निराकरण करणे आवश्यक आहे. यासाठी आपण जर निःशुल्क नियतकालिकांना सुलभपणे आर्थिक हातभार देणारी यंत्रणा किंवा समाशोधन केंद्रे निर्माण केली, तर अनेक संस्था त्यास हातभार लावतील. जेव्हा संस्थाच फक्त ओपन ॲक्सेस नियतकालिकांना APC देऊन पाठिंबा द्यायला लागतील, तेव्हा निःशुल्क नियतकालिकांना APC आकारण्यासाठी उद्युक्त करणारी परिस्थिती निर्माण होईल किंवा प्रत्यक्ष निधी उपलब्ध करून द्यावा लागेल. या कारणासाठी APC देण्याचे उपक्रम, निःशुल्क नियतकालिकांना मारक ठरतील व याचा फटका अनेक लेखक, संस्था, ज्ञानक्षेत्रे, राष्ट्रे याना बसणार असून संपूर्ण जगताचे नुकसान होणार आहे. शिवाय ओपन ॲक्सेस नियतकालिकांचा APC चा पाठिंबा मर्यादित केल्याने, APC च्या मूल्यात वाढ होण्याची शक्यता निर्माण होईल. प्रतिष्ठित आणि प्रभावशाली नियतकालिकांना त्यांच्या मर्जीनुसार APC आकारण्याची मुभा न देता, आपण भविष्यात APC ला पाठिंबा व प्रोत्साहन देणार आहोत का हा प्रश्न आहे.
तथापि मी काही क्षणांपूर्वी मांडलेल्या मुद्द्याकडे लक्ष वेधतो. ज्या ओपन ॲक्सेस नियतकालिकांनी निशुल्क नियतकालिकांच्या प्रारूपांचा कोणताही अभ्यास न करता, शुल्क आधारित किंवा सशुल्क व्यावसायिक प्रारूप वापरले त्यांच्यावर मी टीका करत नाही. मात्र पत्रकार, समीक्षक, प्रकाशक किंवा ओपन ॲक्सेस चे पुरस्कर्ते जवळपास जे सर्वच, ओपन ॲक्सेस नियतकालिके APC घेतात, असा अपप्रचार करतात त्यांच्यावर मी जरुर टीका करीन. निःशुल्क नियतकालिकांना बाजूला सारून त्यांना केवळ आर्थिक पाठबळ न देता, किंवा त्यांच्या बद्दल चर्चा आणि प्रसिद्धी न करता कमी-अधिक प्रमाणात APC च्या मूल्यवृद्धीच्या प्रक्रियेत समकालीन प्रयत्नांचा निभाव लागेल.
· संशोधन साहित्यात ओपन ॲक्सेस असावे या मताचा आपण आग्रही पुरस्कार केला आहे. यादृष्टीने माहिती महाजाल तंत्रज्ञान (internet technology) व वाढत्या अभ्यासपूर्ण साहित्यामुळे संशोधनाचे भांडार सर्वांसाठी खुले होण्यासाठी संपूर्ण जगाची तयारी आणि सहमती कधी निर्माण होईल असे आपल्याला वाटते?
त्याबद्दल मी अंदाज व्यक्त करू शकत नाही. ध्येयाप्रत चालणाऱ्या प्रगतीचा वेग कमी पण स्थिर आहे, इतपतच मी माझे निरीक्षण सीमित ठेवतो. या आलेखाचा चढ जरी कमी असला, तरी तो निश्चितच उंचावणारा आहे. अर्थात त्याला एक नकारात्मक बाजूही आहे. प्रगती फार धीम्या गतीने होत आहे पण त्याला दुसरीही चांगली बाजू आहे. बराच काळ अत्यंत धीम्या गतीने होणारी हि प्रगती निरुपयोगी ठरविणे समर्थनीय आहे. मात्र त्याने सर्व प्रकारच्या विरोधी कंपूचा व FUD चा प्रतिकार केला आहे. नव्याने निर्माण होणाऱ्या ओपन ॲक्सेस साहित्याच्या आकारमानात त्याच्या निर्मितीपासून किंवा एका वर्षाच्या कालावधीत पुरेशी वाढ होत आहे. याचे कारण सर्व प्रमुख प्रकाशक काही वर्षांपूर्वी ओपन ॲक्सेस साहित्याला सामावून घ्यायला तयार नव्हते, ते आता स्वहितासाठी ओपन ॲक्सेस साहित्य सामावून घ्यायला लागले आहेत. आपल्याला कदाचित त्यांच्या ओपन ॲक्सेस पद्धतींचे सर्व तपशील आवडणार नाहीत. परंतु तुम्ही विचारलेल्या प्रश्नाकडे, मी मागे जाऊन मोठ्या परिघाचा विचार करण्यासाठी उद्युक्त करणारा म्हणून पाहतो. अर्थात जे प्रकाशक ओपन ॲक्सेस स्वीकारतात, ते त्यांच्या स्वतःच्या अटींवर स्वीकारतील. मात्र आधी बहुतांश प्रकाशकांनी कोणत्याही स्वरूपातील ओपन ॲक्सेस स्वीकारायला विरोध केला होता. बदलत्या परिस्थितीने त्यांना बदलायला भाग पाडले आणि ते निरंतर चालू राहील.
धीम्या गतीने होणाऱ्या प्रगतीबाबत मी आधीच तक्रार केलेली आहे, तेव्हा मी याबाबतीत संयमी असल्याची बतावणी करू शकणार नाही. तथापि काहीच प्रगती होत नाही म्हणून, धीम्या गतीने होणाऱ्या प्रगतीची चूक टाळण्यासाठी, आपण संयम दाखवायला हवा. पण माझे काही मित्र व सहकारी अशी चूक करतात ते दुर्दैवी आहे. आता प्रगतीला गती देण्यासाठी आपण अधीर असले पाहिजे व धीम्या प्रगतीबाबत संयमित दृष्टिकोन ठेवला पाहिजे. ओपन ॲक्सेस वाढीचा वेग त्याला येणाऱ्या अडचणींच्या मानाने आणि उपलब्ध संधीच्या तुलनेत जलद आहे.
· ग्रंथपाल ओपन च्या तत्त्वांचे जोरदार समर्थन करतात. सातत्याने अनेक मार्गांनी त्याचा प्रचार करतात. आपण त्यांच्या भूमिका आणि योगदानाबद्दल काय म्हणाल? तुम्ही त्यांना काही संदेश देऊ इच्छिता?
ओपन ॲक्सेस जरी समस्त जनतेसाठी असले तरी, त्याचे मुख्य लाभार्थी संशोधक आहेत, म्हणूनच संशोधक ओपन ॲक्सेस समजून घेण्यासाठी, आणि त्यावर काम करण्यासाठी पुढाकार घेतील अशी तुम्ही अपेक्षा कराल. परंतु आपणास तसे दिसत नाही. संशोधक – कार्यकर्त्यांची संख्या मोठी आहे आणि ती वाढते आहे, हे खरे आहे. परंतु ग्रंथपाल त्यांच्यापेक्षाही आघाडीवर आहेत किंवा खूप पुढे आहेत.
जुलै २०११ मध्ये Richard Poynder यांना दिलेल्या मुलाखतीत मी केलेले विश्लेषण अजूनही बदललेलं नाही, “ग्रंथपालांचा गट ओपन ॲक्सेस (तत्व) चा प्रचार करतो. ते कायदेमंडळातील त्यांच्या प्रतिनिधींना त्यासंदर्भात लिहितात, दूरध्वनी करतात, संभाषण करतात, भेटतात. ते एकमेकांशी जोडले जाऊन जाळे तयार करतात, आपल्या आश्रयदात्यांशी, इतर संबंधितांशी आणि सर्वसामान्य जनतेशी संवाद साधतात. ग्रंथपाल repositories निर्माण करून, अद्ययावत करून त्याची देखभाल करतात. ग्रंथपाल त्यांचे अनुभव, केस स्टडीज, सर्वेक्षण आणि उत्तम पद्धती (best practices) यांचे लेखन करतात. ओपन ॲक्सेस ची दखल घेतात. सर्वसाधारणपणे ते ओपन ॲक्सेसविषयीचे विविध प्रश्न, इतर संशोधक, प्रशासक, प्रकाशक, प्रायोजक, धोरण कर्ते व इतर भागधारकांपेक्षा अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतात”.
· भारतातील ओपन ॲक्सेस चळवळीबद्दल आपला दृष्टिकोन व मत काय आहे?
भारतातून दर आठवड्याला ओपन ॲक्सेसविषयी बातम्या येतात. हे मी पाहतो. भारतात ओपन नियतकालिके, open repositories, धोरणे, सामंजस्य या बाबतीत खूप काही घडत आहे.
मला ओपन ॲक्सेस चळवळीचे काही कार्यकर्ते माहित आहेत. पण याचीही कल्पना आहे कि, ही खूप लहान संख्या आहे. मी एवढेच सांगेन की भारताला याहूनहि अधिक कार्यकर्त्यांची गरज आहे, कारण प्रत्येक देशात अशी गरज आहे.
भारतातील बहुतांश संशोधन प्रायोजकांनी प्लान S मध्ये सहभागी न होता त्याला पाठिंबा दिला आहे, ही गोष्ट मला विचारात पाडते. चीनमध्येही हेच घडत आहे. याबाबतची अंतर्गत चर्चा मला समजली ती अशी की, प्लान S चे APC खूप वाटतात किंवा गोल्डन ओपन ॲक्सेस कडे झुकणे भारताला परवडणारे नाही. मोठ्या प्रमाणात भारताला हे APC परवडण्यासारखे नाहीत. यातून काय मार्ग निघतील याकडे माझे लक्ष आहे. मला आशा आहे की सर्व घटकांना समजुन चुकेल कि नवीन व्यापक व सुलभ असा ग्रीन ओपन ॲक्सेसचा पर्याय, सहयोगी प्रायोजकत्वातून नवीन संशोधन, non- compliant नियतकालिकांमधून प्रकाशित करणे सहज शक्य आहे. प्लान S च्या नव्या आवृत्तीत APC न देताहि, प्रायोजकत्वाची तरतूद करता येणे शक्य आहे.
२००९ साली मी सुरू केलेल्या Open Access Tracking Project (OATP) च्या माध्यमातून भारतातील ओपन ॲक्सेस संबंधित बातम्या OA.india या संकेतस्थळावरून टॅग होतात. हे टॅग रिअल टाइम फीड किंवा टॅग ग्रंथालय या स्वरूपात प्रकाशित होतात. त्याच प्रमाणे हे टॅग ग्रंथालय अधिकाधिक कार्यकर्त्यांच्या सहाय्याने सर्वतोपरी परिपूर्ण करण्याचा प्रयत्न होत आहे. मला आशा आहे की OATP ने भारतातील ओपन ॲक्सेस चळवळीबद्दल घेतलेली दखल, भारतातील चळवळीला प्रोत्साहित करेल आणि ती अधिक व्यापक होऊन त्यातील त्रुटी भरून काढेल.
मी याचा उल्लेख करायला हवा की oa.india AND oa.policies, oa.India AND oa.repositories, oa.india AND oa.journal, सारख्या बुलियन कॉम्बिनेशनना OATP ने सतत उत्तेजन दिले आहे. इतकेच नव्हे तर (oa.india OR oa.south) AND oa.plan_S सारख्या अधिक जटील रचनांनाही (Complex Constructions) उत्तेजन देते.
· आपण सध्या कोणत्या प्रकल्पावर काम करीत आहात? आपल्या भविष्यातील योजना काय आहेत?
Hardward Office मध्ये अभ्यासपूर्ण संप्रेषणासाठी माझा बहुतांश वेळ जातो. तथापि माझे ओपन ॲक्सेस च्या रणनीती विषयी व खुल्या साधनसामग्री बद्दल, जनहितार्थ सल्लामसलत करणे चालूच असते. इतर संस्थांच्या ओपन ॲक्सेस धोरणांसंबंधी अंमलबजावणी, हक्कविषयक समजुतींवर माझे काम चालू असते. माझ्या २०१२ साली प्रसिद्ध झालेल्या ओपन ॲक्सेस विषयावरील पुस्तक मी सातत्याने पुरवणीरूपाने अद्ययावत करत असतो आणि विद्यापीठाच्या ओपन ॲक्सेस धोरणाच्या चांगल्या पद्धती (good practices), हि मार्गदर्शिका Stuart Shieber यांच्या संकल्पनांना अबाधित ठेवून अद्ययावत करत असतो. विविध क्षेत्रातील ओपन ॲक्सेस संबंधी बातम्या व भाष्य अद्ययावतीकरणातून निसटू नयेत म्हणून मी OATP साठी प्रत्येक विद्वत्ता विभागात स्वयंसेवकांची नियुक्ती करत असतो. ओपन ॲक्सेस निर्देशिकेच्या संपादक मंडळावर व इतर अनेक सल्लागार मंडळांवर मी कार्यरत असतो. John Hopkins विद्यापीठाने सूचीबद्ध केलेल्या नवीन Public Access Submission System (PASS) च्या अंमलबजावणीसाठी असलेल्या Harvard पथदर्शी प्रकल्पात काम करत आहे. याआधी माझा बहुतांश वेळ “OA Time” साठी बोलण्यात व लिहिण्यात जात होता. पण हल्ली मी त्याला फारसा वेळ देत नाही. तथापि मी माझ्या स्फुटलेखनातून, “उत्तरदायित्त्व” नसलेल्या विद्वत संस्थांमुळे ओपन ॲक्सेस चे भवितव्य कसे बाधित होते, हे मांडत असतो. तसेच विद्वत संस्थांच्या इतर अनेक आघाड्यांवर व क्षेत्रावरही उत्तरदायित्त्व नसण्याचा परिणाम होत असतो.
· या विचारप्रवर्तक मुलाखतीचा शेवट करण्यापूर्वी, मला ओपन ॲक्सेस तत्त्वांवर आधारित तज्ज्ञांच्या कल्पनांचे मुक्तपणे आदान–प्रदान मुलाखतीद्वारे करणाऱ्या, Open Interview या संकल्पनेविषयी आपले मत जाणून घ्यायला आवडेल.
ही खूपच उपयुक्त संकल्पना आहे. अनेक लेखक स्वतःहून संबंधित विषयावर जेवढे जास्त सखोल विचार करत नसतील, त्यापेक्षाही मुलाखतीद्वारे या विचारांची अधिक सखोलपणे चर्चा होते. स्वतः लेखक ज्या विचारांपर्यंत पोहचू शकले नसते, तिथपर्यंत या मुलाखतीमुळे ते पोहोचतात. वाचकांच्या मनातील अनेक प्रश्नांना याद्वारे उत्तरे मिळण्यास मदत होते. हे प्रश्न वाचकांच्या मनात डोकावत आहेत असा विचारही लेखकांच्या मनात कधी आला नसेल. माझ्या बाबतीत मी इतकेच सांगू शकतो की, गेली ५ वर्षे मला उपयुक्त वाटणाऱ्या विषयांवर लिहिण्यापेक्षा मुलाखती देणे मला अधिक सुलभ वाटते.
* * * * *
टीप: या मुलाखतीमध्ये / लेखात दिलेली सर्व उत्तरे / मांडलेली मते हि सर्वस्वी मुलाखत देणाऱ्याची आहेत.
शौचे जोशी, प्रियंवदा (2020 ऑगस्ट 24). पीटर सुबेर: ओपन ॲक्सेस चा सगळ्यात मोठा अडसर, त्याबद्दलचे गैरसमज आणि अपरिचितता हे आहेत (प्रियंवदा शौचे जोशी, अनुवाद). [The largest obstacles to open access are unfamiliarity and misunderstanding of open access itself]. [Blog post]. पुनर्प्राप्त: https://openinterview.org/translations/
प्रियंवदा शौचे जोशी
ग्रंथालय आणि माहिती शास्त्रातील २८ हून अधिक वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. गेली २० वर्षे ठाणे येथील विद्या प्रसारक मंडळाच्या जोशी – बेडेकर महाविद्यालयात ग्रंथालय आणि माहितीशास्त्र विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत. वाचन, लिखाण, कुकिंग, फाईन आर्टस आणि सामाजिक कार्याची आवड. ppjoshi66@gmail.com, priyamwadapjoshi.blogspot.com
मुलाखतकार (इंग्रजीमध्ये): संतोष चं. हुलगबाली, पी.एच.डी