अमृत देशमुख: तुमच्याजवळ काय आहे हे महत्त्वाचं नाही, तर तुमच्याजवळ जे आहे, त्यातून तुम्ही काय करता हे महत्त्वाचं!

पुस्तकांचे सारांश लोकांपर्यंत पोहोचवून त्यांच्यामध्ये वाचनाची आवड जागी करणारा तरुण म्हणून अमृत देशमुख आज सर्वश्रुत आहे. दर आठवड्याला विक्रमी विक्री होणारं एक पुस्तक वाचून त्याचा वीस मिनटांचा सारांश अमृत तयार करतात. हा सारांश स्वतःच्या आवाजात ध्वनिमुद्रित करून, त्यांच्या Booklet ह्या निशुल्क app वर प्रसारित केला जातो. आज ५ लाखांहून अधिक भारतीय हे app वापरतायत.

 अमृत हे चार्टर्ड अकौंटंट, सामाजिक उद्योजक, आणि TEDxह्या नामांकित व्यासपीठाचे वक्ता आहेत. त्यांनी सुरु केलेले पहिले तीन स्टार्ट – अप्स कसे अयशस्वी ठरले हे ते मोकळेपणाने सांगतात. आता Booklet ह्या app च्या माध्यमातून ‘Make India Read’ हे मिशन डोळ्यासमोर ठेवून देशात वाचन संस्कृतीचा प्रसार करण्याचं काम अमृत देशमुख करत आहेत. पुस्तकं वाचनाची सवय ही आपल्याला वेगळ्या पध्दतीने विचार करायला शिकवते आणि सहानुभूतीशील माणूस बनवते, ह्यावर त्यांचा ठाम विश्वास आहे.

Open Interviewसादर करत आहे चिन्मयी भांगे ह्यांनी घेतलेली अमृत देशमुख यांची मुलाखत. वाचनाची आवड रुजवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थेला पाठींबा देणे हा ह्या मुलाखतीचा उद्देश.तर Make India Read ह्या अर्थपूर्ण मिशनसाठी धडपडणाऱ्या अमृतची ह्यांची यशोगाथा Open Interviewउलगडून दाखवत आहे.

.

तुम्ही वाचनाच्या प्रेमात कधीपासून आहात? वाचनाची इतकी गोडी कधीपासून आणि कशी लागली?

लहानपणापासून काही मी वाचनवेडा नव्हतो. मला वाचनाची गोडी लावण्यामागे माझ्या मोठ्या भावाचा वाटा आहे. माझ्या वाढदिवसाला तो माझ्या मित्रांना माझ्यासाठी फक्त पुस्तकं आणायला सांगत असे. जर चुकून कोणी खेळ आणलाच तर तो परत करत असे. मला त्यावेळी खूप राग यायचा. एकदा तर खेळण्यांसाठी मी माझा वाढदिवस आहे असं खोटंच सांगितलं होतं. अकबर बिरबल, शेरलॉक होम्स, चाचा चौधरी अशा गोष्टींच्या कायम सहवासात राहिल्यामुळे मी हळूहळू पुस्तकांच्या प्रेमात पडलो. आज मी Booklet app च्या यशाचं पूर्ण श्रेय मला वाचनाची गोडी लावणाऱ्या माझ्या भावाला देतो.

तुमच्या ह्या वाचनप्रवासात तुमच्या शिक्षकांची भूमिका काय होती?

पुस्तकांनाच मी माझा शिक्षक मानतो. माणूस एकवेळ विचार केल्याशिवाय बोलू शकेल पण विचार न करता लिहू शकत नाही.

मिशन ‘मेक इंडिया रीड’ कशी सुचली? आणि यशस्वी कशी झाली?

तो एक मजेशीर किस्सा आहे. मी त्यावेळी स्वतःच्या start up मध्ये धडपडत होतो. एके दिवशी माझ्या चार्टर्ड अकौंटंट मित्राने मला ‘बाहुबली’ सिनेमा पाहायला बोलावलं. आम्ही सिनेमा थेटरमध्ये १५ मिनिटे आधीच पोहोचलो होतो. सहजच वेळ घालवण्यासाठी मी माझ्या मित्राला नुकत्याच वाचलेल्या पुस्तकाविषयी सांगू लागलो. पुस्तक काय आहे, त्यातून काय शिकावं, असं काहीसं. ते पुस्तक होतं स्टीफन कोवे ह्याचं The 7 Habits of Highly Effective People . ते सगळं ऐकून माझा मित्र खूपच भारावला. तो म्हणाला, “अमृत, मला पुस्तकं वाचायला पुरेसा वेळ मिळत नाही. तू वाचनवेडा आहेस. तू वाचलेल्या पुस्तकाचा थोडक्यात सारांश मला सांगितलास तर तुझ्या वाचनवेडाचा मलाही उपयोग होईल.”

हे तो सहजच बोलून गेला आणि नंतर चित्रपटात रमला. पण मी तिथे नाही रमलो. मला त्याच्या ह्या कल्पनेत खूप मोठी संधी दिसायला लागली. मध्यंतरात नैसर्गिक विधीच्या निमित्ताने बाहेर पडलो ते सिनेमा हॉलच्या बाहेरच सटकलो. अनेक रात्री ह्या विचारात जागून काढल्या आणि शेवटी एका आठवड्याच्या आत ही कल्पना अमलात आणायचं मी ठरवलं.

IT क्षेत्राशी माझा संबंध नसल्यामुळे वेबसाईट किंवा app तयार करण्याचं मला ज्ञान नव्हतं. त्यावेळी Unposted Letterह्या पुस्तकातले टी. टी. रंगराजनह्यांचे शब्द मला आठवले – तुमच्याजवळ काय आहे, हे महत्त्वाचंनाही तर तुमच्याजवळ जे आहे, त्यातून तुम्ही काय करता ते महत्त्वाचे आहे. माझ्याजवळ WhatsApp आहे, मग तेव्हापासून मी प्रत्येक आठवड्याला एक ह्याप्रमाणे WhatsApp वर माझ्या जवळच्या १५ मित्रांना पुस्तकाचा सारांश पाठवायला लागलो आणि त्यांना त्यांच्या मित्रांना ते सारांश पाठवायला सांगितले. दोन आठवड्यांच्या आत मला WhatsApp वर हजारो लोकांनी विनंती केली. ह्या भरघोस प्रतिसादाने मी भारावून गेलो आणि मग मिशन Make India Read दिसायला लागलं.

पाच महिन्यांच्या कालावधीत पन्नास हजारच्या वर हा आकडा गेला. पण किती जण प्रत्यक्षात पुस्तकांचा सारांश वाचतायत हे जाणून घेण्यासाठी एके दिवशी मी एक सर्वेक्षण केलं. आणि त्याचे आकडे खूपच निराशाजनक होते. फक्त १०% लोक वाचत होते माझे सारांश. म्हणजे बरेच जण ह्या मिशनला जोडले गेल्याची बढाई मारत होते. हे सारांश पाठवण्यामागची कल्पना अशी होती की, मोठी जाडजूड पुस्तकं वाचकांना फक्त वीस मिनटात वाचता यावीत. पण तसं होत नव्हतं. मी निराश झालो.

त्यावेळी मी स्वतःला म्हणालो, “काही हरकत नाही. सारांशही वाचायचा नसेल तरी हरकत नाही. मी तुम्हाला वाचून दाखवेन. म्हणून मग मी एक चांगलासा microphone घेतला आणि सारांश माझ्याच आवाजात ध्वनिमुद्रित करायला सुरुवात केली. आता मी WhatsAppवर संहिता आणि ध्वनी अशा दोन्ही स्वरुपात सारांश देऊ लागलो. हे सगळ्यांना खूप आवडलं. बस/ट्रेनने प्रवास करताना, स्वयंपाक करताना, धावण्याचा व्यायाम करताना जसं आपण एकीकडे गाणी ऐकतो, तसच लोक आता सारांश ऐकायला लागले.

तुम्ही WhatsApp वर इतक्या लोकांपर्यत तुझे सारांश पोहोचवायला लागलात, तुमचा अनुभव कसा होता?

मी इतके सारे messeges पाठवत असल्यामुळे अचानक एके दिवशी whatsapp ने माझ्यावर बंदी घातली. त्यांना वाटलं, मी स्पामिंग करतो आहे. पुनःपुन्हा विनंती केल्यानंतर त्यांना मी पटवून देऊ शकलो की, तरुणांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी ह्या उदात्त हेतूने मी हे करतोय. मग काही काळानंतर ही बंदी उठली.

एक लाख वाचकांपर्यंत पोहोचल्यानंतर WhatsApp वरचेवर बंद पडायला लागले. इतक्या मोठ्या प्रमाणात माहितीची ने आण करणे WhatsApp वर शक्य नव्हते. म्हणून मी माझ्या IT मधल्या मित्रांना app तयार करण्याची विनंती केली. शेवटी जागतिक पुस्तक दिनी म्हणजेच २३ एप्रिल २०१६ ह्या दिवशी मी Booklet app सुरु केले.

तुमचं हे mission फक्त भारतापुरते मर्यादित आहे, काही खास कारण?

माझ्या देशावर मी प्रेम करतो हे एकच कारण. ह्याचा अर्थ असा नाही की, अभारतीयांनी ह्या मिशनचा भाग होऊ नये.

तुम्ही पुस्तकांची निवड कशी करता? सारांश कसे तयार करता? ते ध्वनिमुद्रित करणे आणि सगळ्यांना पाठवणे, तेही अगदी आकर्षक पद्धतीने. ही सगळी प्रक्रिया कशी असते? आपल्या वाचकांना ह्या सगळ्याची उत्सुकता नक्कीच असेल.

मी साधारणपणे सर्वाधिक खप असलेली पुस्तकं निवडतो. ज्या पुस्तकाच्या निदान दहा लाख प्रती विकल्या गेल्या आहेत, अशी पुस्तकं मी निवडतो. माझ्या मते, पुस्तके ही कृतीप्रवण असली पाहिजेत. म्हणजे असं की, पुस्तक वाचल्यानंतर वाचकाला काही मूल्य स्वतःमध्ये रुजवण्याची प्रेरणा मिळाली पाहिजे. म्हणजेच, पुस्तकं काल्पनिक असता कामा नयेत. म्हणून मी स्व – मदत, आत्मचरित्र, नेतृत्व कौशल्यावर आधारित, मानवी वर्तणूक, व्यवस्थापनाची तत्त्वे अशा प्रकारच्या पुस्तकांना प्राधान्य देतो. सारांश लिहिण्यासाठी आणि रेकॉर्ड करण्यासाठी एक पुस्तक ठरवलं की त्या पुस्तकाच्या लेखकाला/ प्रकाशकाला इमेल करून त्यांची परवानगी घेतो.

तुम्ही पुस्तकं विकत घेता की, लेखकाकडून किंवा प्रकाशकाकडून मोफत मिळतात?

कधीतरी मी पुस्तक विकत घेतो, पण बहुतेक वेळा लेखक किंवा प्रकाशकाकडून पुस्तकं मिळतात.

तुमचा आवाज आणि सादरीकरणाचं कौशल्य अप्रतिम आहे. तुम्ही ज्या पुस्तकाबद्दल बोलता ते पुस्तक वाचावंसं वाटतं. ही सादरीकरणाची कला कशी विकसित केलीत?

करून पाहणं हेच शिकणं आहे. आधी शिकून घेणं आणि मग ते करणं असे वेगवेगळे टप्पे नसतात. करत राहिल्यानेच हे कौशल्य आत्मसात करू शकलो. आपलं काम उत्तम होण्यासाठी प्रयत्न करा, अचूक होण्यासाठी नव्हे. अचूकता म्हणजे, एकही त्रुटी नसणं. पण अचूकतेबरोबर अहंकार येऊ शकतो. पण उत्तमतेमध्ये तुमच्या त्रुटी लक्षात येतात. (हे कधीकधी भीतीदायक आणि स्वाभिमान दुखावणारं असू शकतं) पण त्यातून शिकत, सुधारणा करत परिपूर्णतेची पातळी गाठू शकता.

तुमचे दृश्य रूपातले सारांश खूपच देखण्या पार्श्वभूमीवर चित्रित केलेले असतात. तुम्ही अशा योग्य जागा शोधता का?

नाही. असं काही नाही. जेव्हा मी काहीतरी नवं वाचतो आणि उत्साहित असतो तेव्हा माझा मोबाईल कॅमेरा घेऊन लगेच रेकॉर्ड करायला सुरुवात करतो.

तुमचा स्वतःचा पुस्तकसंग्रह खूप मोठा असेल? भविष्यात ग्रंथालय सुरु करण्याची काही योजना आहे का, जेणेकरून तुमच्याकडची सगळी पुस्तकं उपलब्ध होतील?

सध्या तरी ग्रंथालय सुरु करण्याचा विचार नाही, पण कोणाला पुस्तकं वाचायची असतील तर booklet पाहता येईल.

एक वाचक म्हणून पुस्तकांनी तुम्हाला काय दिले?

नक्कीच! पुस्तकांनी मला आरोग्य, पैसा, प्रेम आणि आनंद दिला. पुस्तकांनी मला एक सहानुभूती असलेली व्यक्ती केले.

तुमच्या LinkedIn च्या page वर तुमच्या आधीच्या start ups चा उल्लेख केला आहे आणि त्यामध्ये यश मिळालं नसल्याचं देखील तुम्ही मोकळेपणाने सांगितलं आहे. आज Booklet मुळे तुम्ही एक यशस्वी सामाजिक उद्योजक आहात. ज्यांना अजून स्टार्टअप मध्ये यश मिळालेले नाही अशांना तुम्ही काय सांगाल?

अपयश येण्यात गैर काहीच नाही. अपयश ही यशाची विरुद्ध बाजू नाही तर यशाचा एक भाग आहे. तुम्हाला जर अपयश येत नसेल, तर त्याचा अर्थ तुम्ही नवीन काहीच करून पाहत  नाही आहात असा होतो. तरुण उद्योजकांना माझं इतकंच सांगणं आहे की, जर तुम्हाला यश मिळण्याची शक्यता वाढवायची असेल तर, तुमचं अपयश मिळवण्याचं प्रमाणही अधिक असायला हवं.

वेगवेगळ्या लेखकांची हजारो पुस्तकं तू वाचली आहेत. काही विशिष्ट लेखक सांगशील, ज्यांची पुस्तकं तुला खूप आवडली?

होय! मला सायमन सिनेक, स्टीफन कोवी, आणि डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम ह्यांची पुस्तकं खूप आवडतात.

अमृत देशमुख हे नाव आता पुस्तकांचा सारांश ह्याला समानार्थी झालं आहे. आता समाजमाध्यमांवर आणि इतरत्र तुमचा चाहतावर्ग मोठा आहे. आपण करत असलेल्या कामाला मान्यता मिळते तेव्हा कसं वाटतं?

खरं तर प्रसिद्धी, चाहता वर्ग, सन्मान ह्या गोष्टी म्हणजे यश नाहीत. तर तुम्ही जे साध्य केलंय त्याचे हे दुय्यम फायदे आहेत. जेव्हा कोणी मेल करून असं सांगतं, “अमृत, तुमच्यामुळे मी पुस्तकं वाचायला लागलो”; माझ्या दृष्टीने हे यश आहे. सन्मान, पुरस्कार, TED Talks, कौतुक ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे यश नाही तर केलेल्या कामाची पोचपावती आहे.

आपल्या बऱ्याच वाचकांना माहीत नसेल की तुम्ही चार्टर्ड अकौंटंट आहात. तुमची प्रक्टिस आणि वाचन अशा दोन्हीचा मेळ कसा साधता?

खरं तर मी आता चार्टर्ड अकौंटंट राहिलेलो नाही. आपल्या भारताला वाचतं करणे हे माझ्या जगण्याचं उद्दिष्ट ज्या दिवशी मला सापडलं त्या दिवशी मी माझी चार्टर्ड अकौंटंटची प्रक्टिस सोडली.

तुम्ही वाचनाचे भोक्ते आहात, हे निसंशय! तुम्ही आतापर्यत किती पुस्तकं वाचली असतील?

होय, आजवर मी १२५० पुस्तकं वाचली आहेत.

तुमच्या ह्या मिशनमध्ये कोणाला स्वयंसेवक म्हणून सहभागी व्हायचं असेल तर तशा काही संधी आहेत का?

नक्कीच! जर कोणाला खरोखरच काही भरीव सहभाग नोंदवायचा असेल तर मला bookletguy@gmail.comह्या इमेल वर संपर्क करा.

तुमच्या पुढच्या योजना काय आहेत?

माझ्याकडे सुमारे एक हजार पुस्तकांचे सारांश तयार आहेत. पण मी ते सगळे app वर टाकले तर लोकांची ते वाचण्याची प्रेरणा हरवून जाईल. म्हणून माझं म्हणण असं आहे की, “तुम्ही आता उपलब्ध असलेले सारांश वाचा आणि मग पुढचा सारांश माझ्याकडून दिला जाईल. अधिक वाचा आणि अधिक मिळवा.” जेव्हा app अद्ययावत केलं जाईल, त्यावेळी तुमचं वाचन अधिक रंजक असेल. लोकांना पुस्तकाचं सकारात्मक व्यसन लावण्यासाठी मी वचनबद्ध आहे.

∞∞

टीप: ह्या मुलाखतीत दिलेली उत्तरे/ व्यक्त झालेली मते ज्यांची मुलाखत घेतलेली आहे, त्या व्यक्तीची आहेत.


उद्धरण:  भांगेचिन्मयी (2019 March, 8). तुमच्या जवळ काय आहे हे महत्त्वाचं नाही, तर तुमच्या जवळ जे आहे, त्यातून तुम्ही काय करता हे महत्त्वाचं! अमृत देशमुख (अमला पटवर्धन, अनुवाद, 2020 May 23). [Blog post] पुनर्प्राप्त: [It’s not important what you have. It’s important what you do with what you have: Amrut Deshmukh]


श्रेयनिर्देश· अमृत देशमुख ह्यांचे छायाचित्र ·अनुवाद साहाय्य: मृणाल कुंटे आणि चिन्मयी भांगे


मराठी अनुवाद

अमला पटवर्धन

गेली १३ वर्षे डोंबिवली येथील के.वि.पेंढरकर महाविद्यालय येथे ग्रंथपाल म्हणून कार्यरत.लिखाण आणि वाचनाची आवड. सुहृदह्या विद्यार्थी आणि पालकांसाठी काम करणाऱ्यासंस्थेशी २०१४ पासून संलग्न. (amalapatwardhan@gmail.com)


मुलाखतकार (इंग्रजीमध्ये)

चिन्मयी भांगेग्रंथपाल, सेंट फ्रान्सिस तंत्रज्ञान संस्था, मुंबई

Print Friendly, PDF & Email

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *