मेहेक मिर्झा प्रभू ह्या मुंबईस्थित कथाकथनकार, पूर्णवेळ लेखिका, व्होईस ओव्हर कलाकार, सादरकर्त्या, मार्गदर्शक, ब्लॉगर, संहितालेखिका आणि सामाजिक भान असणाऱ्या कलावंत आहेत. वेगवेगळ्या भाषांमध्ये त्या अनेक गोष्टी लिहीतात. त्या ‘झुमरीतलैया’ नावाची कथाकथनाची ऑनलाईन शाळाही चालवतात. समाजमाध्यमांमध्ये आणि इतरत्र त्यांचा चाहतावर्ग मोठा आहे. “How Story Telling Saved Me” (कथाकथनाने मला कसे वाचवले) हे त्यांचे TEDx वरील भाषण म्हणजे त्यांच्या स्वतःच्या अनुभवांचा लेखाजोखा आहे. ऑनलाईन जगात ह्या भाषणाचे खूप कौतुक झाले. त्यांच्या अनेक गोष्टी यु ट्यूबवर मोठ्या प्रमाणात पाहिल्या जातात.
Open Interview सादर करत आहे सतीश बेंद्रे आणि संतोष चं. हुलगबाली ह्यांनी घेतलेली मेहेक मिर्झा प्रभू ह्यांची मुलाखत. मेहेक ह्या अतिशय नैसर्गिक, प्रांजळ आणि प्रतिभासंपन्न कथाकथनकार आहेत हे ह्या मुलाखतीतून अनुभवता येईल. त्यांची उत्तरं कथाकथनकलेचे तात्त्विक सिद्धांत मांडत नाहीत तर, ती शहाणपण आणि व्यवहार ज्ञानाने समृद्ध आहेत. त्याच बरोबर आपण काय करत आहेत आणि कसं करत आहोत हयाचं नेमकं भान त्यांना असल्याचं ह्या मुलाखतीतून जाणवेल. त्यांचे विचार आणि कृती किती साध्या, स्पष्ट तरीही वैशिष्ट्यपूर्ण आहेत हेही वाचकांच्या लक्षात येईल.
:
सतीश: गोष्टी सांगण्याच्या तुमच्या प्रवासाला कशी सुरुवात झाली?
एखादा क्षण तुमच्या आयुष्यात असा येऊन जातो की देव तुम्हाला तुमच्या आयुष्यात काय करायचं आहे ह्याची झलक देऊन जातो. तुम्ही एकतर त्याकडे दुर्लक्ष करता किंवा त्याचा पाठपुरावा करता. मी दुसरा पर्याय निवडला. त्याआधी सुमारे दहा वर्षे मी उद्योजिका होते, त्यामुळे साहजिकच प्रत्येक आव्हानासाठी मी स्वतःला तयार ठेवते.
सतीश: ह्या वेगवान डिजिटल युगात गोष्टी सांगणं मुलांना फार रंजक वाटत नाही असं वाटतं का तुम्हाला? कारण मुलांच्या जवळ बसून विशेषतः, रात्री झोपताना त्यांना गोष्टी सांगण्याइतका पालकांकडे वेळच नाही.
पालकांकडे वेळच नसतो असं सरसकट विधान नाही करणार. प्रत्येक कुटुंबात वेगळं चित्र असू शकतं. उलट मला असं वाटत की आजचे पालक आपल्या मुलांना वेगवेगळे अनुभव मिळवून देण्याच्या बाबतीत जास्त सजग असतात. त्यामुळे असं होत की, आज मुलांना करण्यासारखे उपक्रम खूप आहेत आणि त्यांना विचलित करणाऱ्या गोष्टीही खूप आहेत. माझ्यासाठी जास्त काळजीची गोष्ट ही की, मोठ्यांच्या आयुष्यातून कथाकथन करण्याच्या गोष्टी हद्दपार झाल्या आहेत. कल्पनेमध्ये, गोष्टींमध्ये रमणे म्हणजे तुमच्या मधलं मूल जागं करणं आहे, तुमचा ताण कमी करणं आहे.
सतीश: गेल्या काही वर्षांमध्ये नवीन पिढ्यांचा एका गोष्टीकडे लक्ष देण्याचा कालावधी कमी होत होत काही सेकंदांपर्यंत आला आहे. कथाकथनाच्या कलेचं पुनरुज्जीवन केल्याने हा कालावधी वाढेल असं वाटत का तुम्हाला?
आपल्याला त्यांच्या भाषेत बोलायला हवं, मग ही मुलं आपल्याकडे आनंदाने लक्ष देतील. प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेणे ही कलाकाराची जवाबदारी आहे. मला वाटतं, ही तरुण पिढी तितकी वाईट नाही, जितकी आपण समजतो. खरं तर ती अजून घडते आहे आणि त्यांच्यामध्ये खुलेपणा आहे.
संतोष: शाळा, महाविद्यालय किंवा विद्यापीठांमध्ये शिकवण्याच्या प्रक्रियेमध्ये कथाकथन ही गोष्ट किती महत्त्वाची आहे? शिक्षकांनी कथाकथनाची कला कशी आत्मसात करायला हवी जेणेकरून शिकवणे अधिक रंजक होईल?
मला असं वाटतं की, शिक्षकांनी कथाकथनाचा जरूर अभ्यास करावा पण तो मुलांसाठी नाही तर स्वतःच्या भावनांचा शोध घेण्यासाठी करावा. कथाकथन करणारी व्यक्ती ही आपल्या भवतालाविषयी जास्त सजग असते आणि दुसऱ्याविषयी जास्त आस्थेने विचार करू शकते. अशा व्यक्ती अधिक चांगल्या शिक्षक होऊ शकतात!
संतोष: चांगला कथाकथनकार होण्यासाठी वाचन ही गोष्ट किती महत्वाची आहे?
व्यक्तिशः मला असं वाटतं की, चांगला कथाकथनकार होण्यासाठी तुम्ही उत्तम वाचक असायला हवं असं नाही. आपल्या आसपासच्या वास्तव जगाचं चांगलं निरीक्षण करता येणं, स्वतःची मतं असणं, आणि मनाने मूल असणं हे जास्त महत्वाचं आहे.
संतोष: स्वतःच्या कल्पना आणि अनुभव गोष्टींमध्ये मांडण्यासाठी कोणती कौशल्ये विकसित करावी लागतात असं तुम्हाला वाटतं?
तुमच्या मनात जे आहे, ते सांगण्याची इच्छा असणं तेही निरपेक्षपणे! मला वाटत, कथाकथनकाराकडे हा गुण असणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे.
संतोष: तुमच्याकडे उत्तम अभिनयकौशल्य आहे. तुमच्या कथाकथनाच्या सत्रांमध्ये आम्ही ते कौशल्य पाहत आहोत. मला वाटतं, चांगल्या कथाकथनकाराला अधिक प्रभावी सादरीकरण करण्यासाठी हे अभिनयकौशल्य आवश्यक आहे (शरीराच्या हालचाली, हावभाव, आवाजातले चढ उतार ह्यांव्यतिरिक्त). ह्याविषयी तुम्हाला काय वाटतं?
आपण प्रत्येक जण जन्मतःच कथाकथनकार असतो. बोलणारा किंवा चिन्हांच्या भाषेत स्वतःला व्यक्त होणारा प्रत्येकजण हा कथाकथनकार असतो. अर्थात प्रत्येक व्यक्ती वेगळी असल्यामुळे तिची कथाकथन करण्याची पद्धतही वेगळी असते. काही जणांकडे स्वतःची अशी सांगण्याची शैली असते किंवा शब्दांवर प्रभुत्व असते. अशा वेळी अभिनयाची गरज पडत नाही. पात्रांचा अभिनय करण हे मला आवडतं म्हणून करते, ते गरजेचं आहे असं नाही. एक मोठ्ठं उदाहरण म्हणजे गुलजार साहेब. ते सहजपणे सांगत जातात आणि गोष्ट जिवंत होते.
संतोष: कथाकथन करण्यासाठी गोष्टी निवडताना, कोणता पर्याय अधिक सोपा आहे? स्वतःचे किंवा दुसऱ्याचे जीवनानुभव सांगणे की साहित्यातील गोष्टी वाचणे?
कुठलाच पर्याय सोपा नाही, आणि हीच त्यातली मजा आहे. गोष्टीचा स्रोत कुठलाही असो, कथा दुसऱ्या कोणाची असली तरी तुम्हाला ती स्वतःची म्हणून अनुभवावी लागते, जगावी लागते. तरच सादरीकरण करताना तिला न्याय मिळेल. वेगवेगळ्या पद्धतीने ती आपलीशी करून तुम्ही सादर करत असता.
संतोष: पारंपरिक कथा (परीकथा, लोककथा, पौराणिक कथा, आख्यायिका, दंतकथा, इ) किंवा समकालीन कथा (ऐतिहासिक, राजकीय, आत्मकथन इ.) – कोणत्या प्रकारच्या कथा लोकांच्या मनावर अधिक प्रभाव पाडतात? तुमचं निरीक्षण आणि तुमचा अनुभव ह्या संदर्भात काय सांगतो?
कोणता खाद्यप्रकार लोकांना सर्वात जास्त आवडतो असं विचारण्यासारखं आहे हे. त्याला काही विशिष्ट उत्तर नाही. आपल्या सगळ्यांच्या आवडी निवडी वेगवेगळ्या प्रकारच्या असतात, प्रत्येक प्रकारच्या कथांसाठी वेगवेगळा श्रोतृवर्ग असतो. कथाकथनकार तुमच्या आवडीच्या गोष्टींवर तुम्ही काम करत असता. म्हणून कथा लिहिताना लोकांना काय आवडेल ह्याचा विचार करण्यापेक्षा स्वतःच्या जाणिवांशी प्रामाणिक रहा.
संतोष: तुमच्या बऱ्याचशा कथा मुख्यतः समकालीन आहेत, आजच्या आहेत. तुम्ही जाणीवपूर्वक निवड केली आहेत की तुम्ही इतर प्रकार फारसे हाताळले नाहीत?
गोष्ट कोणत्या प्रकारची आहे, कोणत्या शैलीत आहे ह्याचा मी विचार करत नाही. गोष्ट ही गोष्ट असते. मला काय वाटतं, माझ्या मनात कोणते विचार आहेत, ह्याच्याशी मी प्रामाणिक असते. मी माध्यम आहे. माझं मन, हृदय आणि आत्मा काय सूचना देतात त्या मी पाळते. गोष्टींची निवड करण्याइतकी मी मोठी नाही, गोष्टीच माझी निवड करतात.
संतोष: रंगमंचावर गोष्टी सादर करताना कोणत्या प्रकारची तयारी, मेहनत असते? नियोजनापासून प्रत्यक्ष सादरीकरणापर्यंत तुमचा अनुभव कसा असतो, सांगाल का?
एखादी कल्पना सुचली की ताबडतोब मी कागद पेन घेऊन बसते. अगदी मध्यरात्रीसुद्धा. आणि मग कागदावर उतरवत राहते. पुढचं काम म्हणजे, त्याची संहिता आखीवरेखीव बनवणे, आणि सादरीकरणाच्या दृष्टीने योग्य असा आकृतिबंध बनवणे. आणि मग पुनःपुन्हा त्याचा सराव करत राहणे. कितीही सराव केला तरी तो पुरेसा नसतो.
सर्वसाधारणपणे अशी सगळी प्रक्रिया असते.
संतोष: तुम्हाला लिहायला आवडतं. हे लिखाण रंगमंचावर गोष्ट सादर करण्यापेक्षा सोपं असतं की अवघड?
खरं म्हणजे माझ्यासाठी ह्या दोन गोष्टी भिन्न नाहीत. कारण, मी लिहीत असते, तेव्हाच मनाने रंगमंचावर असते. ह्या दोन्ही गोष्टी एकत्रच घडत असतात.
संतोष: एखाद्याचे जीवनानुभव कथाकथनकारावर कसे प्रभाव टाकत असतात?
मी आधी म्ह्टलं त्याप्रमाणे, तुमच्या गोष्टी म्हणजे तुमचं प्रतिबिंब असतात. कारण श्रोत्यांना काय आवडेल ह्यापेक्षा स्वतःशी प्रामाणिक राहून लिहीत असता. आणि तुमच्या जीवनानुभवातूनच तुम्ही विशिष्ट प्रकारची व्यक्ती म्हणून घडत असता. त्यामुळे अर्थातच तुमचा जीवनानुभव तुमच्या कथांवर परिणाम करत असतोच.
सतीश: डीजीटल क्रांतीमुळे संपर्काचा चेहरामोहराच बदलला आहे. आपलं व्यक्त होणं कमी झालंय, तुटक होत आहोत. आणि त्यामुळे विलग झाल्याची भावना येत असते. ह्या संदर्भात तुम्ही काय सांगाल?
आपण कोणता पर्याय निवडू त्यावर हे अवलंबून आहे. मी अजूनही पत्र लिहीते. ह्याच डिजिटल व्यासपीठावर मोठ्या गोष्टी सांगते. आपलं स्वतःवर नियंत्रण नाही, त्यासाठी आपण तंत्रज्ञानाला दोष देऊ पाहतो. आपण हे विसरतो की, आपण अजूनही बदल करू शकतो आणि आपले पर्याय निवडू शकतो. आपण काही कळसूत्री बाहुल्या नाही.
संतोष: काही लोकांकडे गोष्टी सांगण्याचं अनन्यसाधारण कसब असत पण ते रंगमंचावर उभं राहून गोष्टी सांगून आपल्या कौशल्याला वाव देत नाहीत. किंवा त्यांना रंगमंचावर उभ राहून गोष्ट सांगणं कठीण वाटतं. कथाकथनाचं असं कौशल्य असणाऱ्या मंडळींना तुम्ही काय सांगाल?
रंगमंचावर उभे रहा! विश्वास ठेवा, ते तुम्हाला नक्की खाणार नाही. किंबहुना ते तुम्हाला नवे पंख देईल. माझ्याकडे सभाधीटपणा अजिबात नव्हता. अजूनही प्रत्येकवेळी रंगमंचावर जाताना दडपण असतं माझ्यावर. पण ह्या भीतीवर मात केली की तुम्हाला त्याचा वेगळाच आनंद मिळेल. आणखी एक गोष्ट नक्की सांगेन, स्वतःचं परीक्षण करू नका, तरच लोक तुमचं परीक्षण करणं थांबवतील.
सतीश: कथाकथनाचे कौशल्य आणखी चांगले करण्यासाठी तंत्रज्ञान आणि इन्टरनेटचा कसा उपयोग करू शकतो?
आपल्या गोष्टी आधी आपल्या मित्रमंडळींना आणि कुटुंबियांना पाठवून त्यांच्या उपयुक्त प्रतिक्रिया घेऊ शकता. मग संपूर्ण जगासमोर मांडू शकता. इंटरनेटमुळे हे सोपे आणि शक्य झाले आहे.
संतोष: इन्टरनेट वरचे एखादे tool/ app किंवा माहितीचे संसाधन सांगाल, ज्याचा उपयोग गोष्ट सांगण्यासाठी किंवा त्याच्या तयारीसाठी होऊ शकेल?
होय! airplane mode! होय! गोष्ट तयार करताना offline रहा. त्यामुळे त्या गोष्टी जिवंत होतील. असं म्हटलं जातं की, ‘तुमचं मूल वाढवताना मोबाईल फोन बाजूला ठेवा’ त्याच्याकडे किंवा तिच्याकडे पूर्ण लक्ष द्या. संसाधनांच्या बद्द्ल सांगायचं झालं तर पारंपरिक अभ्यासक्रम आणि शिक्षक ह्यांची मदत घ्या. पण सुरुवात करण्यापासून तुम्हाला कोणीच रोखू शकणार नाही.
सतीश: तुमचे आवडते कथाकार कोण आहेत?
गुलझार साहेब.
सतीश: तुमच्या कथाकथनाच्या सत्रांचा श्रोतृवर्ग कोण असतो?
प्रेक्षकांचा एक विशिष्ट वर्ग नसतो. प्रत्येक मोठ्या माणसामध्ये एक मूल असते, तसेच लहान मुलातही परिपक्वता असते. स्त्री मधील पुरुष असतो किंवा उलटही. मला कल्पना नाही, कोण कोण येतं पण जाताना मात्र भावनांनी भारलेली व्यक्ती परत जाते इतकं मात्र नक्की.
सतीश: तुमच्या कथाकथनाच्या online शाळेविषयी – झुमरीतलैयाविषयी सांगा.
झुमरीतलैया हे माझं सर्वात मोठं स्वप्न आहे, हे छोटे कथाकथनकारांचं गाव असेल, जिथे शिकणे, गोष्टी सांगणे आणि धम्माल करणे हे सगळं असेल. सध्या त्याचे online आणि offline वर्ग सुरु करून नुकतीच सुरुवात केली आहे.
संतोष: आम्हाला माहीत आहे, तुम्ही उत्तम कथाकथनकारांपैकी एक आहात. पण कथाकथनकार म्हणून तुम्ही स्वतःचे मूल्यमापन कसं करता? तुमची बलस्थाने आणि कमकुवत बाजू कोणत्या आहेत, ज्यांच्यावर तुम्ही काम करता?
मी स्वतःचं मुल्यामापन करत नाही. मी माझ्या सगळ्याच वैशिष्ट्यांचं स्वागत करते. त्या सगळ्यांचा एकत्रित परिणाम म्हणून मी आहे. आणि फक्त कथाकथनकार आहे.
संतोष: तुमच्या भविष्यातल्या योजना काय आहेत?
सतीश: बॉलीवूडमध्ये काम करण्याच्या काही योजना आहेत का?
मला कथाकथन ह्या प्रकाराला इतकं मनोरंजक आणि लोकप्रिय करायचं आहे की, बॉलीवूडमधल्या अभिनेत्याला असं विचारलं जायला हवं की,“तुम्ही उत्तम अभिनेते आहात, तर तुम्हाला कथाकथन करायला आवडेल का? हीच माझी पुढची योजना असेल.
∞∞∞∞
टीप: ह्या मुलाखतीत दिलेली उत्तरे/ व्यक्त झालेली मते ज्यांची मुलाखत घेतलेली आहे, त्या व्यक्तीची आहेत.
उद्धरण: बेंद्रे, सतीश आणि हुलगबाली, संतोष चं. (2019 फेब्रुवारी, 21). मेहेक मिर्झा प्रभू: माझ्या गोष्टीची मी निवड करावी इतकी मी मोठी नाही, गोष्टच माझी निवड करते (अमला पटवर्धन, अनुवाद). [I am no one to select my story, the story selects me]. [Blog post]. पुनर्प्राप्त: https://openinterview.org/2019/02/20/i-am-no-one-to-select-my-story-the-story-selects-me-mehak-mirza-prabhu/
श्रेयनिर्देश · मेहेक मिर्झा प्रभू ह्यांचे छायाचित्र –https://www.yourquote.in/ · अनुवाद साहाय्य: मृणाल कुंटे
मराठी अनुवाद
गेली १३ वर्षे डोंबिवली येथील के.वि.पेंढरकर महाविद्यालय येथे ग्रंथपाल म्हणून कार्यरत.लिखाण आणि वाचनाची आवड. ‘सुहृद‘ ह्या विद्यार्थी आणि पालकांसाठी काम करणाऱ्यासंस्थेशी २०१४ पासून संलग्न. (amalapatwardhan@gmail.com)“>
:मुलाखतकार (इंग्रजीमध्ये)
सतीश बेंद्रे, जीवन प्रशिक्षक, satishbendre91@gmail.com
:
..
.
संतोष चं. हुलगबाली, नियंत्रक, Open Interview
santosh@cuh.ac.in
::